Friday, 26 January 2024

अडकित्ता - सुपारी!!!

 अडकित्ता - सुपारी 


सुपारी,

आज दुपारी भेटली एक सुपारी 

थोडी होती चिडलेली,

त्याहीपेक्षा जास्त रडलेली,

समजेना एव्हडी मजबूत व्यक्ति हिला कोण भेटलं रडवणार?


म्हणलं तिला सांग बाई काय झालं ते,

तुला रडवून कोण गेलं ते?


केली सुरवात तिने स्वतःच्या कर्म कहाणीला,

हमसू हमसू लागली रडायला,


म्हणाली मी टणक म्हणून,

सगळ्यांना वाटतं मी खूप strong ,


नाहीच मुळी तस काही,

प्रत्येक जण मला फक्त अडकित्त्यातच ठेवू पाही,


प्रत्येकाचा अडकित्ता आहे वेगळा आहे,

कोणी ठेवत अपेक्षांच्या अडकित्त्यात,

कोणी धरतं कर्तव्याच्या अडकित्त्यात,

कोणी लादतो तो जबाबदारीचा अडकित्ता,

तर अगदीच कोणी डोक्यात घालतो बत्ता,


गम्मत म्हणजे प्रत्येक अडकित्त्यायची धार ती वेगळी,

कोणी चरचर कापते,

कोणी टोमण्यांनी आग लावते,

कोणाचे ते वागणे जीव तोडते,

तर कोणी अगदीच नजरेनेच धाक भरते,


प्रत्येकाची वेगळी गत, पद्धत नी वेगळा पेच,

इथे तुटते, चुरते, झुरते मात्र मीच,


तिची कहाणी आपलीच वाटू लागली,

तिच्या शब्दात आपलीच व्यथा सांगू लागली,


एवढ्यात एकाने अडकित्ता घेतला,

आणि त्या सुपारीचा एक तुकडा काढला,

अशी ही सुपारी,

मला भेटली एका दुपारी.


-किर्ती कुलकर्णी